नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरातील कोणार्क नगर, नरसिंहनगर व सावरकरनगर भागात झालेल्या चार धाडसी घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे नऊ लाख्याच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दोन भरदिवसा झालेल्या घरफोडींचा समावेश असून, चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे पळवून नेले. याप्रकरणी आडगाव आणि गंगापूर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आडगाव शिवारातील मुकूंदराव आनंदराव हिरे (रा. बालाजीनगर,कोनार्क नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बालाजीनगर भागात १० ते १३ जानेवारी दरम्यान चोरट्यांनी दोन घरे फोडले. हिरे व परिसरातील प्रल्हाद भिला जाधव यांचे कुटूंबिय बाहेर गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दोघांची घरे फोडून सुमारे ४ लाख ५३ हजार ६५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
तिसरी घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. सोमवारी (दि.१३) भरदिवसा नरसिंहनगर आणि सावरकर भागातील दोन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे ५ लाख १ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत दिपक वसंतराव बच्छाव (रा. गणाधिश अपा. नरसिंहनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बच्छाव व अॅड जयद्रथ यादव (रा.महारूद्र सोसा.अथर्व कॉलनी सावरकरनगर) यांच्या बंद घराचे चोरट्यांनी भरदिवका कुलूप तोडून बेडरूममधील कपाटांमध्ये ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५ लाख १ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.
…….