नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया घटनांमध्ये घरासमोर रांगोळी काढण्या-या महिलेसह दोघी तरूणींचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी म्हसरूळ अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग करण्यात आल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मखमलाबाद येथील शांतीनगर भागात राहणा-या तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती मंगळवारी (दि.१४) नाशिकरोड भागात गेली होती. सायंकाळच्या सुमारास पीडिता नाशिकरोड मखमलाबाद सीटी लिंक बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. बसमध्ये शेजारी येवून बसलेल्या गंगाराम जगन्नाथ भराडी (मुळ रा. बाजारठाण ता.वैजापूर हल्ली अशोकनगर श्रीरामपूर,अहिल्यानगर) या इसमाने तरूणीचा विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. लोकमान्यनगर भागात राहणारी महिला आपल्या घरासमोर रागोळी काढत असतांना ही घटना घडली. शेजारी राहणा-या खिरोळे यांच्या मुलाने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी संशयिताने मंगेश व अन्य दोन साथीदारांना बोलावून घेत महिलेसह तिचा मुलगा आणि मित्रास मारहाण केली. या घटनेत शिरोळे यांच्या मुलाने महिलेचा विनयभंग केला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे करीत आहेत.
तिसरी घटना विहीत गाव येथे घडली. सौभाग्यनगर भागात राहणा-या युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. प्रथमेश खैरणार (रा.मनमाड ता.नांदगाव) या मामाच्या मुलाने तिला मोबाईलवर अश्लिल फोटो पाठविले तर मयुर भोसले (रा.परेल मुंबई) या परिचीताने तिच्याशी संपर्क साधत अश्लिल संभाषण केले. हा प्रकार बुधवारी (दि.८) रात्री घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.