नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इमारतीच्या मोकळया जागेत ठेवलेल्या फायबर नेटवर्कच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेत ३६ प्रकारचे सुमारे तेरा लाखाचे साहित्य चोरट्यांनी पळविले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजहर जुबेर शेख (रा.लोटस हॉटेल समोर,लॅमरोड विहीतगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांच्या मालकीचे फायबर नेटवर्कचे साहित्य सन.२०१८ मध्ये वडाळा नाका येथील मयुर प्लाझा या इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळय़ा जागेत ठेवण्यात आले होते. या साहित्यातील सुमारे १२ लाख ८२ हजार ६७१ रूपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
…….
घरात घुसून तरूणास बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने घरात घुसून तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना शिंगाडा तलाव येथील गुरूद्वारारोड भागात घडली. या घटनेत दाबेली गाडीचे नुकसान करीत लोखंडी फायटरने मारहाण करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समिर कुरेशी, जहिर कुरेशी (रा.दोघे गुरूद्वारारोड,शिंगाडा तलाव) तसेच लकी, राजू व सर्जील नामक तरूण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत हर्ष मुकूंद डुकरे (२० रा.खोत डेअरीजवळ गुरूद्वारारोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. डुकरे रविवारी (दि.१२) रात्री सोहम शहा या मित्रा समवेत दुचाकीवर डबलसिट आपल्या घराकडे जात असतांना रूची हॉटेल समोर विरूध्द दिशेने आलेल्या समीर कुरेशी याने दोघा मित्रांची वाट अडविली. जुन्या भांडणाची कुरापत काढीत त्याने तू तुझा भाऊ आणि वडिल माझ्या डोक्यात आहेत असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी दोघा मित्रांनी काढता पाय घेत घर गाठले असता संशयिताने आपल्या साथीदारांसह डुकरे यांचे घर गाठले. यावेळी टोळक्याने हर्श डुकरे यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत दाबेली गाड्याचे नुकसान करीत टोळक्यातील एकाने लोखडी फायटरने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला असून अधिक तपास हवालदार डंबाळे करीत आहेत.