नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातील चार घरे फोडून चोरट्यांनी तब्बल साडे तीस लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. या घटनांमध्ये एकमेकांच्या शेजारी राहणा-या मायलेकीची घरे फोडण्यात आली असून, याप्रकरणी सरकारवाडा आणि अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शरणपूररोड भागातील श्रेयांस सुमतीलाल शाह (रा.निवांत रेजंसी सोसा.कॅनडा कॉर्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शाह कुटुंबिय शनिवारी (दि.११) मुंबई येथे गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून मास्टर बेडरूममधील कपाटांमध्ये ठेवलेली सुमारे पंधरा लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २८ लाख ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. दुसरी घरफोडी राठी अमराई भागात भरदिवसा घडली. या घटनेत एकमेकांच्या शेजारी राहणा-या मायलेकीचे घरे फोडण्यात आले. याबाबत प्रशांत रावसाहेब मोगल (रा.श्रीहरीनगर,चोपडा लॉन्स जवळ) यांनी फिर्याद दिली आहे. मोगल यांच्या पत्नी व शेजारी राहणा-या त्यांच्या आई सोमवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मोगल व त्यांच्या सासूचे घर फोडून दोन्ही घरातील सुमारे १ लाख २१ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार व महत्वाचे कागदपत्र चोरून नेले. तिन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे व हवालदार जाधव करीत आहेत.
चौथी घटना जुने सिडको भागात घडली. याबाबत पुंडलिक दामू रूले यांनी फिर्याद दिली आहे. रूले कुटुंबिय दि.६ ते १२ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून तसेच घराचा कडीकोयंडा तोडून किचनमधील कपाटात ठेवलेली ८५ हजाराची रोकड चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.