नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील मदिना चौकात असलेली दोन स्पेअरपार्टची दुकाने चोरट्यांनी फोडली. या घटनेत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात वाहनांच्या वेगवेगळय़ा स्पेअरपार्टचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहनवाज कलीम सय्यद (३८ रा.चौकमंडई, जुने नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. सय्यद यांचे हॉटेल कोर्टयार्ड परिसरातील जुन्या इमारतीत जुने स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. गेल्या शुक्रवारी (दि.१०) रात्री अज्ञात चोरट्यांनी सय्यद आणि शेजारील इमरान मजिद खान यांच्या स्पेअर पार्ट विक्रीची दुकाने फोडली. शटरची कुलपे तोडून दोन्ही दुकानांमधील वेगवेगळ््या वाहनांचे सुमारे १ लाख ९८ हजार रूपे किमतीचे स्पेअरपार्ट चोरट्यांनी पळविले असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी ३१ हजाराच्या ऐवजावर मारला डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळीरोडवरील खर्जुल मळा भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३१ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल निवृत्ती साळवे (रा.विराजनगर,खर्जुलमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साळवे कुटूंबिय शनिवारी (दि.११) अल्पावधीसाठी पाथर्डी फाटा भागात गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड लहान मुलांच्या सोन्याच्या अगठ्या असा सुमारे ३१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.