वाहनचोरीचे सत्र सुरूच…तीन मोटारसायकल चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी गंगापूर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अंबडलिंकरोड भागात राहणारे शफिक शगीर खान हे गेल्या बुधवारी (दि.८) कॉलेजरोड भागात गेले होते. दुर्गा कॅफे या दुकानासमोर पार्क केलेली त्यांची एमएच १५ जीझेड २९६५ मोटारसायकल चोरट्यानी चोरून नेली. दुसरी घटना महात्मानगर भागात घडली. नितीन भास्कर बिरारी (रा.सिकसिग्मा हॉस्पिटलजवळ महात्मानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बिरारी यांची एमएच १५ जीई २४७४ मोटारसायकल गेल्या गुरूवारी रात्री त्यांच्या कुणाल पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार गोसावी व मोहिते करीत आहेत. तर तुशार बाळू गांगुर्डे (रा.स्वामी समर्थ केंद्रामागे,जाधव संकुल) यांची पल्सर एमएच १५ जेएन ९२५३ मोटारसायकल शनिवारी (दि.११) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.
टोळक्याचा रात्री धुडघूस…चार जणांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड गावातील बुध्दविहार भागात रविवारी (दि.१२) रात्री टोळक्याने धुडघूस घातला. दहशत माजविणा-या टोळक्याने दुकानांवर दगडफेक करीत व्यावसायीक दांम्पत्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर सोनार,दादू साबळे,विक्की निकम व एक अनोळखी तरूण (रा.सर्व अंबड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुनंदा शिरसाठ (रा.भोर टाऊनशिप,अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. शिरसाठ यांचे बुध्दविहार परिसरात नंदा गारमेंट नावाचे कपड्यांचे दुकान असून, रविवारी रात्री शिरसाठ दांम्पत्य दुकान वाढविण्याच्या तयारीत असतांना ही घटना घडली. परिसरात दहशत माजविणाºया टोळक्याने शिरसाठ यांच्यासह अन्य दुकानांवर दगड फेक केली. यावेळी शिरसाठ दांम्पत्याने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी पती पत्नीच्या दिशेने दगडफेक करीत जीवे मारण्याचा धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भांडे करीत आहेत.