नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी रविवारी (दि.१२) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात अल्पवयीन मुलांसह ४५ वर्षीय अनोळखीचा समावेश आहे. तिघांच्याही नैराश्याचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत गंगापूर,सातपूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुष प्रदिप पाटील (१५ रा.संत आशिर्वाद बंगला,कृषीनगर कॉलेजरोड) या मुलाने शनिवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत बेल्टच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवे करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील केवलपार्क भागात घडली. सिंधूकुमारी धनंजय सिंग (१७ रा.दत्तमंदिराजवळ केवलपार्क) या मुलीने रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. मेव्हणे संतोष सिंग यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवलदार बेंडकुळे करीत आहेत.
तिसरी घटना नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात उघडकीस आली. ४५ वर्षीय अनोळखी पुरूषाने रविवारी सायंकाळच्या सुमारास ब्रम्हागिरी रेस्ट हाऊस कंपाऊंडच्या मधील प्लॅट फार्म १ च्या शेवटच्या टोकाला असलेल्या पिंपळाच्या झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर इसमाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या नैराश्याचे कारणही समोर आले नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाने दिलेल्या खबरीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.