नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्किगमध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या सोसायटी सदस्यांवर एकाने चाकू हल्ला केल्याची घटना पंचवटीतील त्रिकोणी बंगला भागात घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पारखे (रा.साईपाम अपा.त्रिकोणी बंगल्याजवळ ) असे चाकू हल्ला करणा-या संशयितांची नाव आहे, याबाबत भुषण मनोहर परदेशी (रा.साईपाम अपा.त्रिकोणी बंगल्याजवळ ) यांनी फिर्याद दिली आहे. परदेशी व संशयित पारखे एकाच इमारतीत वास्तव्यास असून मंगळवारी (दि.१७) परदेशी सोसायटीच्या पार्किंगमध्ये अन्य सदस्यांशी गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. या ठिकाणी आलेल्या संशयिताने तुम्हाला जास्त झाले आहे का मी तुम्हाला पाहून घेतो असे म्हणत संशयिताने सर्व सदस्यांना शिवीगाळ केली.
यावेळी पाठीमागे लपवून आणलेला चाकू काढून त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदस्यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने परदेशी यांच्यासह संदिप कराटे,रोशन सुमराव व शुभम सुमराव आदींवर वार केले. या घटनेत चार सदस्य जखमी झाले असून अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.