नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पॉलिश करण्याच्या बहाण्याने भामट्यानी वृध्देच्या सोन्याच्या बांगड्या हातोहात लांबविल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या बांगड्या भामट्यांनी पळविल्या असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नलिनी रामदास बºहाटे (७४ रा.सचिन फर्निचर समोर,सैलानी बाबा स्टॉप) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ब-हाटे या गेल्या २० डिसेंबर रोजी आपल्या घरी एकट्या असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास दोन भामट्यांनी त्यांना गाठले. पाणी पिण्याचा बहाणा करून भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. यावेळी त्यांनी सोन्याच्या जुन्या वस्तूंना पॉलिस करून देत असल्याचे सांगितल्याने ही फसवणुक झाली. भोळया भाबड्या ब-हाटे यांनी त्यांच्या हातातील बांगड्या संशयितांच्या स्वाधिन केल्या असता त्यांनी हातचलाखीने बांगड्या पळविल्या. अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी…६८ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर अंबड लिंकरोडवरील म्हाडा कॉलनी भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६८ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललिता बापू गायकवाड (रा.कल्पतरू रो हाऊस,तिरूपती हॉस्पिटल मागे) यांनी फिर्याद दिली आह. गायकवाड या बुधवारी (दि.८) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली तीन हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६७ हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.