नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या काही दिवसांवर मुलाचा विवाह येवून ठेपलेला असतांना दांम्पत्याने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार शरणपूररोडवरील टिळकवाडी भागात घडला. लग्नसोहळया निमित्त आयोजीत धार्मिक विधीचा कार्यक्रम आटोपून पती पत्नीने टोकाचे पाऊल उचलले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. या दांम्पत्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षा जयेश शहा (५५) व जयेश रसिकलाल शहा (५८ रा. यश कृपा बंगलो,टिळकवाडी शरणपूररोड) असे आत्महत्या केलेल्या दांम्पत्यांचे नाव आहे. शहा दांम्पत्याने रविवारी (दि. ५) रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या बंगल्यात विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले. मुलाने तात्काळ दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र सोमवारी (दि. ६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषित केले. सरकारवाडा पोलिसांनी दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केली असता तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा आत्महत्येपूवीर्ची चिठ्ठी सापडलेली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून, आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झालेला नाही.
शहा दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले असून, त्यापैकी एक विवाहित आहे. मोठा मुलगा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, धाकट्याचे २६ जानेवारी रोजी विवाह होता. लहानग्याच्याविवाह सोहळया निमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. रविवारी (दि. ५) विवाह सोहळया निमीत्त एका धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या संख्येने पाहूण्यांनी हजेरी लावली होती. दिवसभर बंगल्याच्या आवारात जेवणावळ पार पडली. सर्व पाहूणे मंडळी आपआपल्या घरी गेली असता मोठा मुलगाही कामानिमित्त घराबाहेर पडला तर धाकटा जवळच देवदर्शनासाठी गेला होता.
रात्री दहा वाजेच्या सुमारास रक्षा यांनी मोठ्या मुलाला फोन केला, तेव्हा त्यांचा आवाज हुंदका लागल्यासारखा येत होता, असा दावा नातलगांनी पोलिसांसमोर केला. तर काहीवेळात मोठा मुलगा घरी पोहोचल्यानंतर त्याने आईवडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याचे बघितले. दरम्यान, कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना दाम्पत्याने अचानक आत्महत्या का केली, यासह या घटनेमागे इतर काही कारणे आहेत का, यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत.