नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील एकास सायबर भामट्यांनी चांगलाच दणका दिला. मुंबई पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी नरेश गोयल याच्या मनी लॅण्डींग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करीत ही फसवणुक केली. अवघ्या पाच ते सहा दिवसात साडे तेरा लाख रूपये उकळले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील एकास संशयितांनी मोबाईल आणि व्हॉटसॲप कॉलद्वारे संवाद साधत मुंबई पोलीस आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण मिळविणाºया ट्राय या संस्थेतून बोलत असल्याचे भासवले. नरेश गोयल याच्या मनी लॅण्डींग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करीत भामट्यांनी तक्रारदारास धमकावले. याप्रकरणात कारवाई टाळण्यासाठी भयभीत झालेल्या तक्रारदारास तब्बल १३ लाख ५० हजार रूपये वेगवेगळया बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले.
हा प्रकार दि.१४ ते १९ डिसेंबर दरम्यान घडला. मात्र, हा प्रकार बनाव असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.