नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– टोळक्याचा वाद मिटविणे एका तरूणास चांगलाच महागात पडला. समजून सांगणा-या युवकास बेदम मारहाण करीत त्रिकुटाने सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ही घटना तपोवनातील रामसृष्टी गार्डन भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ बबनराव सोनवणे (३५ रा.पाटील गल्ली,जुने नाशिक) या तरूणाने याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे शनिवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास तपोवनातील रामसृष्टी गार्डन भागात गेला होता. फेरफटका मारत असतांना तीन तरूण एकमेकांमध्ये शिवीगाळ करतांना आढळून आले. त्यामुळे सोनवणे याने त्यांचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली.
संतप्त त्रिकुटाने आपला मोर्चा समजून सांगणा-या सोनवणे यांच्याकडे वळवित त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत भामट्यांनी सोनवणे यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.