नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोशल मीडियावर परदेशी व्यक्तीशी ओळख करणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. भामट्याने विदेशी वस्तूंचे पार्सल पाठविण्याचे आमिष दाखवत महिलेसह तिच्या भाचीच्या पतीस पावणे दोन लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड येथील पाण्याची टाकी भागात राहणा-या ३७ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. सोशल मिडीयावर सक्रिय राहणा-या महिलेची इन्स्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यमातून भामट्यांशी संपर्क आला. विदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी करणा-या व्यक्तीने महिलेशी वेळोवेळी संपर्क साधत तिचा विश्वास संपादन केला. यावेळी त्याने परदेशातून भेटवस्तू पाठवित असल्याचे सांगून ही फसवणुक केली.
गेल्या एप्रिल महिन्यात महिलेसह भामट्यांनी महिलेच्या भाचीच्या पतीस आपल्या जाळयात अडकवून सुमारे एक लाख ८० हजार रूपयांना फसविले. या रकमा ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यास भाग पाडण्यात आले असून अधिक तपास निरीक्षक फुलपगारे करीत आहेत.