नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढत असतांना वृध्द प्रवाशाच्या गळयातील सोनसाखळी चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना ठक्कर बाजार बसस्थानकात घडली. या घटनेत सुमारे ६५ हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या चैनवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र सिताराम महाडिक (६५ रा.कांदिवली,मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाडिक गेल्या २६ डिसेंबर रोजी मुंबईहून शहरात आले होते. सकाळच्या सुमारास ते कळवण येथे जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. नाशिक कळवण बसमध्ये चढत असताना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे दीड तोळे वजनाची सोन्याची साखळी हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत
महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काठेगल्लीतील त्रिकोणी गार्डन भागात घडली. या घटनेत सुमारे सव्वा लाखाच्या सोन्याच्या पोतीवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललिता विनायक दाणी (रा.काठेगल्ली,द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दाणी शुक्रवारी (दि.३) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्रिकोणी गार्डन परिसरातून त्या आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील एक लाख १२ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
…….
पाच जुगारींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाघाडी येथील संजयनगर भागात उघड्यावर जुगार खेळणा-या पाच जुगारींच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
निरज हेमंत गजमल,अख्तर अकबर शहा,किशोर नामदेव कांबळे,नितीन मोहन मानभाव व निलेश नारायण जोशी (रा.सर्व वाघाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. संजय नगर येथील कैलास पाटील याच्या घर परिसरात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.३) रात्री पथकाने धाव घेत ही कारवाई केली. या ठिकाणी संशयित उघड्यावर पत्याच्या कॅटवर अंदरबाहर जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार २२० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याबाबत अंमलदार कुणाल पचलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार मालसाणे करीत आहेत.