नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबईच्या प्रवाशास मारहाण करीत लुटणा-या तीन जणांच्या टोळीस पोलीसांनी बेड्या ठोकल्या. निर्जनस्थळी रिक्षातून उतरून देत भामट्यांनी मारहाण करीत प्रवाश्याच्या मोबाईलसह कपड्यांची बॅग पळविली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी सुरेश पवार,प्रदिप बबन म्हस्के व विलास लहाणू दांडेकर (रा.तिघे जेलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किरण भालेराव सिसोदे (४५ रा.मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. सोमवारी (दि.३०) मध्यरात्री ही लुटमार झाली होती. सिसोदे बहिणीस भेटण्यासाठी रेल्वेने शहरात दाखल झाले होते. दोन प्रवासी बसलेल्या रिक्षातून ते वनविहान कॉलनीत जाण्यासाठी प्रवास लागले असता ही घटना घडली होती.
रिक्षाचालकासह अन्य दोघांनी संगनमताने करून निर्जनस्थळी नेवून सिसोदे यांना बेदम मारहाण करण्यात आली. मोबाईलसह कपड्यांची बॅग बळजबरीने हिसकावून घेत भामट्यांनी सिसोदे यांना रिक्षातून ढकलून देत पोबारा केला होता. याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल होताच पोलीसांनी मिळालेल्या रिक्षानंबरच्या आधारे तिघांच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल बिडकर करीत आहेत.