नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चोरट्यांचा धुमाकूळ घातला असून पार्क केलेली वाहने पळविली जात आहे. गेल्या काही दिवसात वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरट्यांनी पळविल्या असून, याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
अमृतधाम परिसरातील शुभांगी सोमनाथ आवारे (रा.मंडलिकमळ,अमृतधाम) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ जीके ९७०८ गेल्या ३१ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या म्हाडा बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
दुसरी घटना कॉलेजरोड भागात घडली. गणेश संजय धुमाळ (रा.स्वामी विवेकानंदनगर,मखमलाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धुमाळ २९ डिसेंबर रोजी कॉलेजरोड भागात गेले होते. डॉमिनोज समोरील कॅम्पस चॉईस कॅफे समोर त्यांनी आपली एमएच १५ एचएक्स ३७५० पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
तिसरी घटना गोल्फ क्लब मैदान भागात घडली. ओमकार अमित वाटमकर (रा.गजानन चौक,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाटमकर ३१ डिसेंबर रोजी गोल्फ क्लब भागात गेले होते. इदगाह मैदान परिसरात लावलेली त्यांची युनिकॉर्न एमएच १५ एफआर ०३२७ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बहिरम करीत आहेत. तर राजेंद्र माधव धात्रक (रा.पवार मळा, तपोवनरोड) यांची ज्युपिटर एमएच १५ जेझेड १३०८ गेल्या बुधवारी (दि.१) रात्री रविशंकर मार्ग येथील स्टोन फिटनेस जिम भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.