नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात नुकत्याच झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. त्यात रिक्षातून प्रवास करणा-या एका महिलेचा समावेश असून, याप्रकरणी सातपूर, देवळाली कॅम्प व आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
स्वारबाबानगर येथील समाधान चुनिलाल शिंदे (३३ रा.अमरधामरोड) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या आई समवेत गेल्या २५ डिसेंबर रोजी रिक्षातून प्रवास करीत आहे. सातपूर मनपा विभागीय कार्यालयासमोर मद्यधुंद चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अॅटोरिक्षाचा अपघात झाला. या अपघातात शिंदे यांना किरकोळ तर त्यांच्या आईस गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक पंकज निकम याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.
दुसरा अपघात देवळाली कॅम्प येथील उमराव विहार भागात झाला. या अपघातात राधाकिसन रामनाथ यादव (६२ मुळ रा.बिहार हल्ली कॅथे कॉलनी दे.कॅ म्प) या वृध्दाचा मृत्यू झाला. आर्मी कॉर्टर भागात गल्या ३० डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता. भरधाव किया सेलटॉस कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राधाकिसन यादव या वृध्दास धडक दिली होती. या अपघातात यादव यांच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी रामकेश जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सुभाष दास या कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
तिसरा अपघात कुबाटा टॅक्टर हाऊस भागात झाला. या अपघातात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा गौरव ज्ञानेश्वर पाटील (२० रा.उत्तमनगर,सिडको) या युवकाचा मृत्यू झाला. पाटील गुरूवारी महामार्गावरून दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत होते. द्वारकाकडून जत्रा हॉटेलच्या दिशेने प्रवास करीत असतांना कुबोटा ट्रॅक्टर शोरूम परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. लोकमान्य हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून कुटूबियाने त्यास आडगाव मेडिकल कॉलेज येथे हलविले असता उपचार सुरू असतांना डॉ.संकेत पालीकोंडावावर यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ. सलोनी पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.