नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात चोरट्यांनी नवा फंडा अवलंबविला असून, उभ्या वाहनांच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज लांबविला जात आहे. बुधवारी (दि.१) वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडून भामट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका, सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाथर्डी फाटा भागात राहणारे गणेश प्रभाकर कांबळे (रा.रायबा हॉटेल मागे) हे बुधवारी रात्री कुटूंबियासह जेवण करण्यासाठी नेहरू गार्डन भागात गेले होते. महाराष्ट्र बँकेसमोर पार्क केलेल्या त्यांच्या एमएच १५ जेएक्स ७३१९ कारची पाठीमागील दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी मागील सिटावर ठेवलेल्या दोन पर्स चोरून नेल्या. या पर्समध्ये मोबाईल व रोकड असा सुमारे साडे दहा हजार रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.
दुसरी घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. मोहन निवृत्ती पिंगळे (रा.डिकेनगर,गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. पिंगळे यांची कार गुरूवारी दुपारच्या सुमारास बिएसएनएल ऑफिस समोरील चैतन्य हॉस्पिटल भागात पार्क केली असता चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप असलेली बँग चोरून नेली. या बॅगेत अॅपलचा लॅपटॉप व मोबाईल असा सुमारे ८० हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.
तिसरी घटना सिटीसेंटर मॉल भागात घडली. अभिषेक धनंजय खेर (रा.खारगर मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खेर गुरूवारी कंपनीच्या मिटींगसाठी शहरात आले होते. मॅकडॉनल्ड दुकानासमोर त्यांनी आपली क्रिस्टा कार एमएच ०२ एमआर १८५० पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारचया ड्रायव्हर सिटाच्या पाठीमागील काच फोडून बॅग चोरून नेली. या बॅगेत १८ हजाराची रोकड व कपडे असा सुमारे १८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.