नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सराफी दुकानातील बांगड्यावर डल्ला मारणारे गुजरातचे चोरटे बहिण भाऊ पंधरवाड्यानंतर पोलीसांच्या जाळयात अडकले. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पाळत ठेवून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, संबधितांना उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत विनोदभाई परमार (५५) व पुनम कमलेश शर्मा (५७ रा.दोघे अहमदाबाद गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या १७ डिसेंबर रोजी नाशिकरोड येथील पु.ना.गाडगीळ आणि सन्स या सराफी पेढीत चोरी झाली होती. खरेदीच्या बहाण्याने शोरूममध्ये शिरलेल्या महिलेसह पुरूषाने काऊंटरवरील कर्मचा-यास बोलण्यात गुंतवून सुमारे अडिच लाख रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या हातोहात लांबविल्या होत्या. याप्रकरणी नयन माळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांनाच ही घटना सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाल्याने त्याबाबतचे छायाचित्र अन्य सराफी व्यावसायीकांना पाठविण्यात आल्याने संशयित पोलीसांच्या हाती लागले. बुधवारी (दि.१) नात्याने बहिण भाऊ असलेले भामटे कॅनडा कॉर्नर येथील एका सराफी पेढीत गेले. कुठलीही बातचित न करता दोघे दुकानाबाहेर पडल्याने कर्मचा-यांना संशय आला. छायाचित्राची पडताळणी करीत व्यावसायीकाने एका कर्मचा-यास भामट्यांच्या मागावर सोडत ही बाब उपनगर पोलीसांना कळविली. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी या घटनेची दखल घेतल्याने गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने कॅनडा कॉर्नर परिसरात धाव घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.