नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पळसे ता.जि.नाशिक येथील देशी दारू दुकान चोरट्यांनी फोडले. थर्टी फर्स्टच्या पुर्वसंध्येस ही घटना घडली असून, या घटनेत भामट्यांनी गल्यातील रोकडसह दारूच्या सुमारे सव्वा लाख रूपये किमतीच्या बॉक्सवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम काशिनाथ चंद्रमोरे (रा.पळसेगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रमोरे यांचे पळसे गावातील गांधी पेट्रोलपंप परिसरात देशी दारूचे दुकान आहे. सोमवारी (दि.३०) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी पत्रा उचकटून ही चोरी केली.
दुकानात शिरलेल्या चोरट्यानी गल्ल्यातील चिल्लर आणि रोकड, मोबाईल व प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूचे सुमारे १ लाख १५ हजार ८९० रूपये किमतीचे ३७ बॉक्स चोरून नेले असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.