नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात एकास दहा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. साठेखत करारनाम्याच्या माध्यमातून कर्ज फेडण्यासाठी रक्कम स्विकारूनही सदनिका परस्पर महिलेस बक्षीसपत्र करून देण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात ठकबाज दाम्पत्यासह एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसन गोपाळ राठोड,निलम किसन राठोड व शुभांगी अर्जुन उग्रेज अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत नरेश बाबुलाल शाह (६८ रा.गंजमाळ,भद्रकाली) या वृध्दाने फिर्याद दिली आहे. राठोड यांच्या मालकीचे मखमलाबाद शिवारातील विजय प्राईड या अपार्टर्मेटमधील फ्लॅट नं. ८ या सदनिकेचा शाह यांनी सन.२०२३ मध्ये व्यवहार केला होता. घर विक्रीस असल्याचे सांगून भामट्यांनी हा घर खरेदी विक्रीचा व्यवहार केला होता.
एल अॅण्ड टी या फायनान्स कंपनीचे घरावर दहा लाखाचे कर्ज असल्याचे सांगून भामट्यांनी ही फसवणुक केली. १५ मार्च ते २ डिसेंबर या काळात शाह यांनी साठेखत करारनामा करून कर्ज फेडण्यासाठी राठोड दांम्पत्याकडे दहा लाखाची रक्कम सुपूर्द केली. मात्र संशयितांनी या घराचे विक्री साठे खत केलेले असतांनाही परस्पर शुभांगी अर्जुन उग्रेज यांच्याशी व्यवहार करून त्यांना घर बक्षीसपत्र करून दिले. फसवणुकीची ही बाब निदर्शनास येताच शाह यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.