नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी (दि.३१) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर व गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोदी करण्यात आल्या आहेत.
नाशिकरोड येथील कॅनलरोड भागात राहणा-या विकास लोटन गोसावी (३२ रा.आम्रपाली झोपडपट्टी) या युवकाने सोमवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या लोखंडी पाईपास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ पंकज गोसावी यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गुंड करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. मंगेश चिंतामन गांगुर्डे (३६ रा.शिवशक्ती चौक,लकी पार्क शिवाजीनगर) या तरूणाने मंगळवारी अज्ञात कारणातून दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत दिपक आल्हारे यानी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.