नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून भरघोस नफ्याचे आमिष दाखवत एकाने संगमनेर येथील तरूणास आठ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. डी मॅट अकाऊंट उघडण्याच्या बहाण्याने ही रक्कम उकळण्यात आली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन उर्फ साईनाथ पारूजी घोलप (रा.दिघवद ता.चांदवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजाचे नाव आहे. याबाबत मयुर बबन हासे (३४ रा.चिखली ता.संगमनेर) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. हासे या युवकाशी सन.२०१९ मध्ये संपर्क साधण्यात आला होता.
संशयिताने महात्मानगर येथील स्वप्नपुर्ती फायनान्सियल सर्व्हीसेस या आपल्या कार्यालयात बोलावून घेत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. यावेळी डी मॅट अकाऊंट उघडण्याचा बहाणा करीत हा गंडा घालण्यात आला. हासे यांच्याकडून २८ सप्टेंबर ते २२ आॅक्टोबर २०१९ दरम्यान आठ लाख रूपयांची रोकड स्विकारण्यात आली. मात्र चार पाच वर्ष उळटूनही मोबदला अथवा नफा न मिळाल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.