नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उभ्या बसमध्ये सिनेस्टाईल पध्दतीने टोळक्याने कांदा व्यापा-यास लुटल्याचा धक्कादायक प्रकार मेळा बसस्थानकात घडला. धक्काबुक्की करीत व्यापा-याच्या ताब्यातून ११ लाख ६६ रूपयांची रोकड असलेली कापडी पिशवी भामट्यांनी हिसकावून नेली. या घटनेत व्यापा-याने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने एक परप्रांतीय चोरटा हाती लागला असून, त्याचे तीन साथीदार मात्र रोकड घेवून पसार झाले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्वर झहीर सिद्दीकी मनियार (४८ रा.कुआ बुलंद,उत्तरप्रदेश) असे प्रवाश्यांच्या मदतीने अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत विष्णू वामन पाचोरे (रा.शिवाजीनगर,सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. पाचोरे कांदा व्यापारी असून ते ३१ डिसेबर रोजी सकाळी उमराणा ता. मालेगाव येथे कांदा खरेदीसाठी जात असतांना ही घटना घडली. उमराणा येथे जाण्यासाठी ते मेळा बसस्थानकात आले होते. साडे सात वाजेच्या सुमारास ते नाशिक धुळे बसमध्ये प्रवासासाठी बसले असता ही घटना घडली. सुमारे ११ लाख ६६ हजार ३०० रूपयांची रोकड असलेली बॅग सिटावरील कॅरीवर ठेवून ते आसनस्थ झाले असता बसमध्ये चढलेले चार पाच जणांचे टोळके त्यांच्याजवळ घुटमळू लागले.
प्रसंगावधान राखत त्यांनी बॅग खाली काढण्याचा प्रयत्न केला असता एकाने बॅग उघडून पैश्यांनी भरलेली पिशवी हिसकावून नेली. पाचोरे यांनी वेळीच आरडाओरड केल्याने बसमध्ये चढणा-या व स्थानकातील धाव घेत चोरट्यांपैकी एका संशयितास पकडून बेदम चोप दिला असून त्यास पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. या घटनेत तिन भामटे पैश्यांची पिशवी घेवून पसार झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुकदेव काळे करीत आहेत.