नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशकात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोष सुरु असताना उंटवाडीरोडवरील क्रांतीनगर भागात एकाचा त्याच्याच मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे (३४, रा. क्रांतीनगर) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला. लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिजवान काजी (दोघे रा. क्रांतीनगर) यांनी त्याला सोबत नेले. ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन ते आले.
तेथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लक्ष्मणसोबत त्यांनी वाद घातला. शिवीगाळ करत संशयितानी त्याच्या डोक्यात दगड टाकला. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर दोघेही हल्लेखोर दुचाकीने फरार झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शाखेची पथके संशयीतांच्या मागावर रवाना झाली.