नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेवगा पाल्याचे बाकी असलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्यास दोघांनी शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मखमलाबादरोडवरील फडोळमळा भागात घडला. या घटनेत दाम्पत्याचा मोबाईल हिसकावून घेत भामट्यांनी फोडून नुकसान केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल ठाकरे व त्याचा अनोळखी साथीदार (रा.फडोळमळा,मखमलाबादरोड) अशी संशयितांची नावे आहे. याबाबत सतिश नरहरी नागरे (३४ रा.खडक ओझर ता.चांदवड) यांनी फिर्याद दिली आहे. नागरे यांनी आपल्या शेतात शेवग्याची लागवड केली असून ते हर्षल ठाकरे यांना पाल्याची विक्री करतात. ठाकरे यांच्याकडे काही रक्कम घेणी असल्याने गुरूवारी (दि.२६) दुपारी नागरे दांम्पत्य फडोळ मळा भागातील नागरे यांच्या मॉलवर गेले असता ही घटना घडली. नागरे दांम्पत्याने पैश्यांची मागणी केली असता संतप्त दोघांनी त्यांना शिवीगाळ केली.
या घटनेचा नागरे यानी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी मोबाईल हिसकावून घेत जमिनीवर आपटून फोडून टाकला. तसेच पैसे नाही देत तुला काय करायचे ते करून घे असे म्हणत दांम्पत्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.