नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी बसमधून पाठविलेले काजूचे पार्सल चोरट्यानी चोरून नेले. हा प्रकार कोल्हापूर ते नाशिक दरम्यान घडला. या घटनेत सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीचे काजूने भरलेले ३२ डबे चोरीस गेले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश उत्तम तोरसकर (रा. टेंबलाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या बसचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तोरसकर गेल्या गुरूवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास ए.आर. ०१ आर ४९८१ ही ट्रव्हल्सची खासगी बस घेवून नाशिकच्या दिशेने प्रवासास लागले असता ही घटना घडली.
या बसमध्ये प्रवाश्यांबरोबरच डिक्कीत गडहिंग्लज येथील अनमोल ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीकडून काजूचे डबे असलेले पार्सल ठेवण्यात आले होते. सदरचे पार्सल नाशिकच्या बालाजी नट्स या व्यावसायीकास पोहच करायचे होते. मात्र प्रवासात ५० डब्यांपैकी २ लाख २४ हजार रुपये किमतीचे काजूने भरलेले ३२ डबे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.