नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाईपिंग परिक्षेत डमी विद्यार्थ्याने परिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाईपिंग इन्स्टिट्यूट संचालकांनी मदत केल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून या घटनेची राज्य परिक्षा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात परिक्षार्थी विद्यार्थी, तोतया व टायपिंग इन्स्टिट्यूट संचालकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास अशोक शिक्रे (रा.खानापूर,पुणे),सानिका कॉम्प्युटर व टायपिग इन्स्टिट्यूटचे संचालक राजेश पंढरीनाथ सायंकर व अनोळखी तोतया इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्राचार्य जालिंदर रामचंद्र झनकर (रा.रामवाडी,पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिर परिसरात असलेल्या प्रमोद पाटील ज्युनिअर कॉलेज येथे हा प्रकार समोर आला.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे च्या वतीने गेल्या शनिवारी (दि.२१) मराठी टंकलेखन परिक्षा घेण्यात आली. प्रति मिनीट ३० शब्द (जी.सी.सी -टीबीसी ) या परिक्षेत सानिका इन्स्टिट्यूटच्या विकास अशोक शिक्रे या विद्यार्थ्या ऐवजी तोतया उमेदवार मिळून आला. चौकशीत इन्स्टिट्यूटमधूनच हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने परिक्षा परिषदेने या घटनेची दखल घेतली असून थेट पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.