नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची पोलीसांनी सुटका केली. वडाळागावातील साठेनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून त्यात एक गाय व तीन गोऱ्हे अशी सुमारे दोन लाख रूपये किमतीच्या जनावरांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन जनांविरोधात प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू कुरेशी व शोएब कुरेशी (रा. वडाळागाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कसाईंची नावे आहेत. वडाळागावातील साठेनगर मागे असलेल्या असद यांच्या फार्म हाऊससमोरील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची माहिती इंदिरानगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (दि.२७) पहाटे छापा टाकून जनावरांची सुटका केली. पत्र्याच्या शेडमध्ये एका जर्सी गाईसह जर्सी व गिर जातीचे तीन गोऱ्हे क्रुरतेने डांबून ठेवले होते. पोलीसांनी जनारांची सुटका करीत दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.