नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबलेल्या प्रवासी महिलांचे अलंकार चोरट्यांनी चोरून नेले. या घटनामध्ये भामट्यांनी सुमारे साडे तीन लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारला असून, त्यातील एका महिलेचे कारमधील पर्स मधून तर दुसरीचे रूममध्ये ठेवलेल्या बॅगेतून अलंकार लांबविण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील वाळूंज भागात राहणाऱ्या संजिवणी राहूल राजपूत या कुटूबियासमवेत शहरात आल्या होत्या. राजपूत कुटूंबिय दि. २४ ते २६ डिसेंबर दरम्यान नासर्डी नदी पुल परिसरातील हॉटेल ईरा बाय ऑरचिड येथे मुक्कामी थांबले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी राजपूत यांच्या बॅगमधील सुमारे ३ लाख १० हजाराचे दागिणे लांबविले आहे.
दुसरी घटना इंदिरनगर जॅागिंग ट्रॅक भागात घडली. याबाबत सुमेधा नितीन वराडे (रा.पिंप्री चिंचवड,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. वराडे कुटूंबिय शनिवारी (दि.२८) सुचितानगर येथील हॉटेल सयाजी इनराईस येथे थांबले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या पार्किग मध्ये लावलेल्या कारचा दरवाजा कश्याने तरी उघडून पर्स मध्ये ठेवलेले सुमारे ४० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. दोन्ही घटनांप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.