नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात कुणी नसल्याची संधी साधत एका परिचीताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली. मुलीने कशी बशी सुटका करून घेत आरडाओरड केल्याने संशयिताने धुम ठोकली असून, याप्रकरणी पोलीस दप्तरी विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय वाघ (रा. म्हसरुळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडिता रविवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर भांडी धुवत असतांना ही घटना घडली. परिचीत असलेल्या संशयिताने मुलीचे घर गाठून हे कृत्य केले.
घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने भांडी धुवत असलेल्या मुलीचा हात पकडून तिला घरात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने भामट्यांने धुम ठोकली. मुलीने घरी परतलेल्या कुटुंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक बळवंत गावित करीत आहेत.