नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ सोशल मीडियावरील वाद मिटविण्यासाठी आलेल्या धुळयातील तरूणावर नाशकात चाकू हल्ला करण्यात आला. या घटनेत ३४ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दांम्पत्यासह एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून दीपाली गांगुर्डे, संतोष गांगुर्डे व आयुश नेटावणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत वाल्मिक लक्ष्मण आहिरे (रा.रेल्वे स्टेशनरोड धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. आहिरे यांनी शनिवारी (दि.१४) इन्स्टाग्राम या सोशल साईटवर एक प्रेमाविषयी स्टोरी अपलोड केली होती. दुस-या दिवशी त्यावर दीपाली गांगुर्डे यांनी कमेंट करीत शिवीगाळ केल्याचे दिसले. त्यामुळे आहिरे यांनीही शिवीगाळ केल्याने ही घटना घडली.
रविवारी संतोष गांगुर्डे यांनी संपर्क साधल्याने आहिरे नाशिकरोड भागात वाद मिटविण्यासाठी आले होते. गांगुर्डे दांम्पत्याने त्यास आबेडकर पुतळा भागात बोलावून घेत आहिरे यांना बेदम मारहाण केली. यावेळी संशयित नेटावडे याने धारदार चाकूने आहिरे यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरीकांनी त्यांना कॅन्टोमेंट हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून पोलीस जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.