नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उच्चशिक्षीत तरूणीस ब्लॅकमेल करीत एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने सलग चार वर्ष अत्याचार केला असून त्याचा अतिरेक वाढल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक शिवाजी पानसरे (२३, रा. संगमनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सशयिताचे नाव आहे. परजिह्यातील पीडिता शहरात उच्चशिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयात संशयितही शिक्षण घेत असून त्यांच्यात मार्च २०२१ मध्ये ओळख झाली होती. शरणपूर लिंकरोड भागात राहणाऱ्या संशयिताने युवतीस आपल्या घरी बोलावून घेत अत्याचार केला. कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देत संशयिताने हे कृत्य केले.
या घटनेचा अश्लिल व्हिडीओ व फोटो मोबाईल मध्ये काढून त्याने सलग चार वर्ष ब्लॅकमेल केले. फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जात युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर क्षुल्लक कारणांवरून पीडितेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.