नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) खंडणी देण्यास नकार दिल्याने संतप्त दुचाकीस्वार टोळक्याने अंडाभूर्जी विक्रीचा गाडा पलटी करून नुकसान केल्याची घटना नाशिकरोड येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रतीक नेल्सन कांबळे (रा. सुभाष रोड, नाशिकरोड) यांचा नाशिकरोड रेल्वे स्टेशन बस स्टॅण्डजवळ अंडाभुर्जीचा गाडा आहे. या गाड्यावर श्याम बाळू पवार व राम बाळू पवार हे काम करीत होते.
त्यावेळी परिसरात राहणारे आरोपी शाहीद शौकत सय्यद (वय २१, रा. टाऊन हॉलजवळ, नाशिकरोड), अरमान अमजद पठाण (वय २२, रा. पवारवाडी, सुभाष रोड), गणेश रेवगडे (रा. पाटील गॅरेज, नाशिकरोड) व अविनाश डावरे (रा. देवळाली गाव, नाशिक) हे एका मोटारसायकलीवरून तेथे आले. त्यांनी प्रथम हातातील कोयते रिक्षावर मारून फिर्यादी कसबे यांच्याकडे हप्त्याची मागणी केली; मात्र कसबे याने नकार दिला असता त्याचा राग या टोळक्यास आला.
त्यांनी त्यांच्या हातातील कोयता अंडाभुर्जीच्या गाड्यावर काम करणाऱ्या राम पवार याच्या हातावर मारून अंडाभुर्जीचा गाडा पलटी करून नुकसान केले, तसेच फिर्यादी हे राहत असलेल्या पवारवाडी येथे जाऊन या टोळक्याने धारदार कोयता घेऊन परिसरातील लोकांना शिवीगाळ व दमदाटी करून दहशत पसरवली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शाहीद सय्यद व अरमान पठाण या दोघांना अटक करण्यात आली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.