नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोर्सेसची फ्रेंचायझी देण्याच्या बहाण्याने भामट्याने एकास पंधरा लाख रूपयाना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संदीप सत्येंद्र रॉय (रा. श्रीरामनगर, इंदिरानगर, नाशिक) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी पुनीत शर्मा (रा. कुर्ला, मुंबई), कंपनीचे उपाध्यक्ष रिचा भद्रा, आदित्य मुकुंद माथूर व कंपनीचे कर्मचारी विवेक गुप्ता व जतीन सोलंकी यांनी फेसबुकवर फायनान्स अकाऊंटिंग ह्युमन रिसोर्स व असे अनेक कोर्सेस चालविण्याची फ्रेंचायझी देण्याबाबत जाहिरात केली होती.
फिर्यादी रॉय यांनी आरोपींच्या महिंद्रा कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डावरून ४ लाख ५५ हजार, तसेच २५ फेब्रुवारी रोजी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डावरून ४ लाख ९५ हजार, अशी महिंद्रा कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डावरून २ लाख ४४ हजार ५०० रुपये असे मिळून एकूण ७ लाख ३९ हजार ५०० रुपये इतकी रक्कम व त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२३ रोजी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डावरून २ लाख ४४ हजार ५०० रुपये इतकी रक्कम फिर्यादी रॉय यांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे ट्रान्स्फर केली. मात्र फ्रेंचायझी न देता १५ लाख रुपयांची संगनमत करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.