नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुलास सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून भामट्याने एकास ७६ हजार रुपयांना गंडवले. याबाबत पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुनील प्रभाकर भावसार (रा. गणेशवाडी, पंचवटी) यांचे कटलरीचे दुकान आहे. त्यांचा मुलगा योगेश भावसार हा सुशिक्षित बेरोजगार आहे. आरोपी प्रतीक रामेश्वर राऊते (रा. एकतानगर, बोरगड, म्हसरूळ) याने फिर्यादी भावसार यांच्याशी संपर्क साधला. “तुमच्या मुलाला सिव्हिल हॉस्पिटल येथे सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी भावसार यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपी प्रतीक राऊते याने नोकरी लावून देण्यासाठी भावसार यांच्याकडून फोन पेद्वारे ७६ हजार ३८० रुपये स्वीकारले; मात्र मुलाला नोकरी लागत नसल्याने फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. हा प्रकार जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात प्रतीक राऊतेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.