नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॉटचे खरेदी खत करून देतो, असे सांगून एका इसमाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नरेंद्र सदाशिव सोनार (रा. चेतनानगर, इंदिरानगर) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी चंदन विजय कुवर याने सन २०१८ मध्ये फिर्यादी सोनार यांना सिटी सेंटर मॉलजवळील कालिका पार्क येथे नाशिक मनपा हद्दीमध्ये सर्व्हे नंबर ७६४/१ मधील प्लॉट नंबर ११ क्षेत्र २५९.४० चौ. मी. या प्लॉटचे खरेदी खत करून देतो, असे सांगून सोनार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खरेदी खताचे काम करून देण्यासाठी कुवर याने फिर्यादी यांच्याकडून १५ लाख रुपयांची रक्कम एनईएफटीद्वारे स्वीकारली. त्यानंतर काम होत नसल्याने आरोपी चंदन कुवर याने दोन वेळा फोन पेद्वारे ९८ हजार रुपये फिर्यादी यांना दिले.
उर्वरित १४ लाख २ हजार रुपये सोनार यांनी कुवर याच्याकडे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व प्लॉटचे खरेदी खत न देता सोनार यांची १४ लाख २ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी चंदन कुवरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक उंडे करीत आहेत.