नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडी येथे मोबाईलचे शोरूम फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील महागडे मोबाईल फोन व रोकड असा सुमारे पावणेसात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विशाल शांताराम भदाणे (रा. जोगेश्वरी हाईट्स, पांगरे मळा, सिडको) यांचे उंटवाडी येथे मधुरा टॉवर्समध्ये एस. एस. एंटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या दुकानाच्या शटरचे लॉक टॉमीच्या सहाय्याने व दरवाजाचे इंटरलॉक तोडून दुकानात प्रवेश केला.
दुकानात असलेले ६ लाख ६८ हजार ३०० रुपये किमतीचे ॲपल, एमआय, सॅमसंग व वन प्लस कंपनीचे मोबाईल, तसेच साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज दुकान फोडून चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.