नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्रिकुटाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या ताब्यातील रोकड पळविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत भामट्यानी ४१ हजार रुपयांची रोकड जबरीने चोरून नेली असून याप्रकरणी पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रोहित संजय निरगुडे (रा. मु. पो. लाखलगाव, ता. जि. नाशिक) हा व त्याच्यासोबत काम करणारा रोहित कापसे असे दोघे जण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील लाखलगाव येथे नीलेश पेट्रोल पंपावर नाईट ड्युटी करीत होते. त्यावेळी रात्री दोन वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी अचानक पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या तिघा अज्ञातांनी तलवार, कोयता व रॉडचा धाक दाखवून फिर्यादी निरगुडे व त्याचे सहकारी कापसे यांच्याकडे असलेली पेट्रोल विक्रीची ४१ हजार ५०० रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेतले व पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात पळून गेले.
या प्रकरणी आडगाव ककठाण्यात तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल मुंडे करीत आहेत.