नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी साधून एका दाम्पत्यासह तीन जणांनी संगनमत करून घराची कड़ी उघडून घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा २ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मखमलाबाद येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संगीता अनिल रावणचौरे (रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, मखमलाबाद) या दि. २६ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून आरोपी देवेश विजय बघे, त्याची पत्नी कांचन देवेश बघे व देवेश याचा मित्र आकाश यांनी संगनमत करून रावणचौरे यांच्या बंद घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला.
घरातील किचन रूममध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यात असलेली १ लाख ५० हजार रुपये किमतीची दीड तोळा वजनाची सोन्याची पोत, ४० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके, दहा हजार रुपये किमतीची सोन्याची लगड, २० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व आठ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.