नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बसमध्ये चढत असताना वृद्धेजवळील पर्समध्ये असलेले सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना द्वारका सर्कल बस स्टॉप येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुरेखा प्रकाश बागल (वय ६५, रा. दामोदरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) या काल (दि. २३) सायंकाळी ६ च्या सुमारास पुणे येथे जाण्यासाठी द्वारका सर्कलजवळील बस स्टॉपजवळ आल्या होत्या. त्या बसमध्ये बसत असताना तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्याजवळील पिशवीची चेन उघडली व त्या पिशवीत असलेली छोटी पर्स घेऊन त्यात असलेल्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, एक तोळा वजनाचे कानातील टॉप्स, तसेच पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल व पाचशे रुपये रोख असे एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवांदे करीत आहेत.