नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– टेंडरमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी बापू तुळशीराम शिरसाठ (वय ६०, रा. तिडके कॉलनी, नाशिक) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, तर आरोपी प्रतीक मदन पाठण (रा. सटाणा, ता. बागलाण) हा आदिवासी विकास भवन येथे नोकरीला आहे. पाठण याने फिर्यादी शिरसाठ यांना नाशिक येथील आदिवासी विकास भवन या कार्यालयाच्या माध्यमातून विविध कामांसाठी निघणाऱ्या टेंडरमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून त्यातून अधिक पैसे मिळवून देऊन जादा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी शिरसाठ यांनी आरोपी प्रतीक पाठण याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यावर ८ लाख १० हजार रुपये जमा करण्यास सांगितले.
त्यानंतर बरेच दिवस उलटूनही शिरसाठ यांना कोणतेही टेंडर मिळाले नाही व गुंतविलेल्या रकमेवर जादा नफाही मिळाला नाही. हा प्रकार दि. १ जानेवारी २०२३ ते दि. ३१ मे २०२४ या कालावधीत घडला. फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्याने शिरसाठ यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रतीक पाठणविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.