नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चार अपघातांमध्ये दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
अपघाताचा पहिला प्रकार नाशिकरोड परिसरात घडला. ईश्वर संदीप औटी (रा. मु. पो. राजुरी, जि. पुणे) हे त्यांच्या कुटुंबीयांसह चारचाकी गाडीतून राजुरी येथून त्र्यंबकेश्वर येथे जात होते. सिन्नर फाटा सिग्नल येथे त्यांची कारने डिव्हायडरला ठोस मारल्याने अपघात झाला. त्यात आवटी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघाताचा दुसरा प्रकार शिंगाडा तलाव येथे घडला. सलीम यासीन मणियार (वय ६४, रा. ड्रीम व्हॅली, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांच्या डोक्याला मुका मार लागला त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघाताचा तिसरा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. फिर्यादी लीला बाबूसिंग जाधव (रा. डेमसे मळा, पाथर्डी फाटा, नाशिक) या १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पाथर्डी फाटा ते मुंबई-आग्रा हायवेवरील गॅलॅक्सी सुपर मार्केटमधून पायी जात होत्या. त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. त्यात त्यांना दुखापत झाली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताचा चौथा प्रकार भगूर येथे घडला. फिर्यादी दीपक मारुती जाधव (रा. भगूर, ता. जि. नाशिक) हे त्यांच्या ताब्यातील एमएच ४० एजी १५६९ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने रायबा हॉटेल येथे चिकन देण्यासाठी जात होते. त्यावेळी लहवितकडून येणाऱ्या एमएच १५ एचपी ३०८५ या क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाने जाधव यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी जाधव व त्यांचा मुलगा ओम्कार जाधव (वय २४) या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.