नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातून दुचाकी चोरी करणा-या चोरट्यास पोलीसांनी पारोळा (जि.जळगाव) येथे बेड्या ठोकल्या. चोरट्यांने चोरीच्या मोटारसायकली जळगाव जिह्यात विक्री केल्याचे पुढे आले असून पोलीसांनी या कारवाईत तब्बल २७ मोटारसायकली पोलीसांनी जप्त केल्या आहेत. संशयिताच्या अटकेने शहरातील १४ गुन्हे उघडकीस आले आहे. ही कारवाई मोटारसायकल चोरी शोध पथकाने केली.
किशोर संजय चौधरी (३० रा.तरवाडे ता.पारोळा,जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिक शहरातून चोरी होणा-या मोटारसायकली जळगाव जिल्हयात विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस पथक पारोळा येथे तळ ठोकून होते. पारोळा पोलीसांच्या मदतीने हुडकून काढत पथकाने संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. जळगाव जिह्यातील शिवरे,तरवाडे,आडगाव व धरणगाव भागातील शेतकरी व कामगारांना अल्पदरात चोरीच्या मोटारसायकली विक्री केल्याची कबुली दिल्याने पथकाने तब्बल २७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
संशयिताच्या अटकेने त्यामुळे मुंबईनाकासह सातपूर व पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेले चौदा गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके मुंबईनाकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे तसेच पारोळाचे उपअधिक्षक सुनिल नंदवाळकर वरिष्ठ निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,हवालदार योगेश चव्हाण,दत्तात्रेय चकोर पोलीस नाईक मंगेश जगझाप,रविंद्र दिघे अंमलदार भगवान जाधव,गणेश वजडे तसेच जमादार रोहिदास सोनार,अंमलदार गणेश बोरणारे,समिर शेख,नवनाथ उगले तसेच पारोळाचे उपनिरीक्षक राजू जाधव,हवालदार प्रविण पाटील पोलीस नाईक संदिप सातपूते अंमलदार गवळी,अभिजीत पाटील आदींच्या पथकाने केली.