नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून महिलेने सोन्याचे दागिने व रोकड असा ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना राजीवनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुनीता राजेंद्र बाविस्कर (रा. राजीवनगर) ही महिला आर्किटेक्ट विजय अग्रवाल यांच्या बंगल्यात वॉचमन म्हणून काम करते. या फिर्यादी महिलेच्या घरात संशयित महिला सोनाली माने (रा. भगतसिंग झोपडपट्टी, इंदिरानगर) हिने प्रवेश केला.
त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून त्यात असलेले ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप, तीन हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व २३ हजार रुपये रोख असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज घरातून चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोनाली मानेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.
कपड्यांच्या दुकानात चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कपड्यांच्या दुकानाच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्याने दुकानातील कपड्यांचे तागे, रेडीमेड पँट, डीव्हीआर व रोकड असा ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथे घडली.
याबाबत अरुण कृष्णा कपोते (रा. जय भवानी रोड, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. कपोते यांचे आर्टिलरी सेंटर रोडवरील एनएमसी कॉम्प्लेक्समध्ये स्टीच आर्ट मेन्सवेअर या नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला व तेथे असलेले दहा हजार रुपये किमतीचे कपड्यांचे दोन नग तागे, सहा हजार रुपये किमतीच्या रेडीमेड पँट्स, दहा हजार रुपये किमतीचा डीव्हीआर व १६ हजार रुपयांची रोकड असा ४२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बोडके करीत आहेत.