नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथे दुसरा फ्लॅट घेण्यासाठी वडिलांकडून दहा लाख रुपये आणले नाहीत म्हणून हा छळ केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही १२ फेब्रुवारी २०२० ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत टागोरनगर येथील प्रथमेश पार्क इमारतीत सासरी नांदत होती. त्यावेळी पती, सासरे, सासू, नणंद, नंदोई, नणंदेचे सासरे व चुलतसासरे यांनी संगनमत करून विवाहितेला शिवीगाळ करीत विवाहितेला फारकत देऊन टाक, आम्हाला चांगली मुलगी मिळेल, असे बोलून तिचा छळ केला, तसेच तुझ्या घरच्यांनी लग्नात दागदागिने कमी दिले.
आमच्या मनासारखे लग्न झाले नाही. तुला जर राहायचे असेल, तर पुण्यात दुसरा फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भोळे करीत आहेत.