नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हात दारूची विक्रसाठी बेकायदा वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ग्रामिण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापूतारा आणि चांदवड देवळा मार्गावर सापळा लावून तिघा तस्करांच्या मुसक्या आवळत तब्बल पंधरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात महागड्या वाहनांसह दारू साठ्याचा समावेश आहे.
वणी सापूतारा आणि देवळा चांदवड मार्गावरून बेकायदा मद्यवाहतूक होत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२०) सापळे लावण्यात आले होते. कसबे वणी गावातील आरटी कॉलेज समोर पथकाने इवॉन कार अडवून तपासणी केली असता देशी दारूचा साठा आढळून आला. घटनास्थळी वाहनासह मद्यसाठा असा ३ लाख १८ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चालक साईनाथ भरत जाधव (२५ रा.वागळुद – लखमापूर ता.दिंडोरी) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याने हा मद्यसाठा किरण नागरे (रा.रामवाडी,नाशिक) याच्या दुकानातून विक्री साठी आणल्याची कबुली दिल्याने याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई चांदवड देवळा मार्गावर करण्यात आली. गणुररोडवरील आशिष वाईन शॉप येथे बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला असता दारूने भरलेली इर्टीका कार पोलीसांच्या हाती लागली. या कारवाई सागर रेश कोतवाल (३०) व प्रसाद किशोर सोनवणे (२४ रा.दोघे चांदवड जि.नाशिक) या तस्करांच्या मुसक्या आवळत पथकाने इर्टीका कारसह मद्यसाठा असा सुमारे १० लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर,अनिकेत भारती कळवणचे उपविभागीय अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी,मनमाडचे बाजीराव महाजन आदींच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजू सुर्वे,जमादार सुदाम मुंंगसे,हवालदार किशोर खराटे,सचिन देसले, प्रविण गांगुर्डे पोलीस नाईक नितीन डावखर,प्रदिप बहिरम,हेमंत गिलबिले अंमलदार सागर खाडे,प्रविण पवार,पुरूषोत्तम वाटाणे,सुनिल गांगोडे,किशोर बोडखे,ज्ञानेश्वर गांगुर्डे व हेमंत वाघ आदींच्या पथकाने केली.