नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूर पोलीसांना गुंगारा देणारा चोरटा उपनगर पोलीसांच्या हाती लागला आहे. या चोरट्याच्या अटकेने दहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले असून संशयिताच्या ताब्यातून मोबाईलसह मोटारसायकली असा सुमारे १० लाख ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२० रा. राजनगर,गोवर्धनगाव,गंगापूर) असे संशयित अट्टल चोरट्याचे नाव आहे. मोटारसायकल चोरी आणि चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपनगर पोलीस गुरूवारी (दि.१९) नाशिक पुणा रोडवरील पाल ढाबा भागात स्टॉप अॅण्ड सर्चची कारवाई करीत असतांना संशयित पोलीसांच्या हाती लागला. चौकशीत त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने त्याचा अभिलेख तपासला असता तो अट्टल चोरटा असल्याचे समोर आले. तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरार असल्याचे समोर येताच संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, पोलीस कोठीत त्याने दहा मोटारसायकली गंगापूर डॅम व दुगाव शिवारात लपवून ठेवल्याची माहिती दिली.
पथकाने संशयिताच्या अंगझडतीत मिळून आलेले चार मोबाईल व चोरीच्या दहा मोटारसायकली असा सुमारे १० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आह. उपनगर,गंगापूर,सातपूर,पंचवटी,भद्रकाली व नाशिक तालूका पोलीस ठाणे हद्दीतून संशयिताने मोटारसायकली चोरी केल्या आहेत. चोरी केलेल्या दुचाकी तो ग्रामिण भागात विक्री करीत असल्याचे पुढे आले आहे. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णिक,उपायुक्त मोनिका राऊत,सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन बारी व उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीव फुलपगारे,उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे,सुरेश गवळी,जमादार मिलींद शेजवळ,हवालदार विनोद लखन,इम्रान शेख,संदिप हिवाळे शिपाई सुरज गवळी,सौरभ लोंढे, संदेश रघतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी,अनिल शिंदे, सुनिल गायकवाड, उदय शिरसाठ, सतिश मढवई, मिलींद बागुल व होमगार्ड फिरोज तडवी आदींच्या पथकाने केली.