नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मिळकत खरेदी विक्री प्रकरणात बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून व सहाय्यक दुय्यम निबंधकास हाताशी धरून स्टॅम्प ड्युटी न भरता शासन आणि आयकर विभागाची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मे.जे.एस.एम एन्टरप्रायझेस तर्फे भागीदार विनोद कन्हैय्यालाल मनवाणी व अन्य भागीदार तसेच मिळकतीचे मुळ मालक विश्वनाथ हॉटेल प्रा.लि तर्फे रमेश विश्वनाथ मेहेर व अन्य भागीदार तसेच त्यांना मदत करणा-या व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत देवेंद्र युवराज पाटील (रा.भगवती चौक, राजीवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार २४ सप्टेंबर २०२० ते २९ जुलै २०२२ दरम्यान घडला. संशयित यांनी महाार्गावरील सर्व्हीस रोडला असलेल्या सुर्या हॉटेलच्या बाजूला असलेल्या मिळकतीच्या खरेदी विक्री व्यवहारात ही फसवणुक केली.
मुळ मालक असलेल्या विश्वनाथ हॉटेल कंपनी व मे.जे.एसएम एन्टरप्रायझेस यांच्यातील मिळकत व्यवहारात बनावट दस्त आढळून आले आहेत. तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक नाशिक ४ यांच्याशी संबधीतांनी संगणमत करून सरकारी बाजारमुल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी न भरता तसेच भुसंपादन मोबदल्याची रक्कम स्व:ताकडे येण्यासाठी बनावट दस्त केल्याचे समोर आहे. या व्यवहारात शासनाचा महसूल बुडविल्याने आयकर विभागाची मोठी फसवणुक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनार करीत आहेत.