नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लष्करात भरती होणा-या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी मोबाईलवर बोलण्यात गुंतवून शहरातील डॉक्टर दांम्पत्याच्या बँक खात्यावर डल्ला मारला. या घटनेत दांम्पत्याच्या खात्यातील साडे आठ लाखाची रोकड हातोहात लांबविण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील एका डॉक्टर महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या १४ नोव्हेंबर रोजी महिला आपल्या हॉस्पिटल मध्ये सेवा बजावत असतांना त्यांच्याशी ८६३८७८२७७२, ८८२२३३१९९३ व ७९८२३७२६१२ या मोबाईलधारकांनी संपर्क साधला होता. कॅप्टन सतीश कुमार आणि कर्नल श्रीकांत शर्मा अशी नावे सांगत भामट्यांनी इंडियन आर्मीमध्ये भरती होणा-या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत विचारपूस केली. वेळोवेळी संपर्क साधून भामट्यांनी डॉक्टर महिलेस बोलण्यास गुंतवून बँक खात्यांची ऑनलाईन गोपनिय माहिती चोरली.
या माहितीच्या आधारे भामट्यांनी डॉक्टर दाम्पत्याची बँक खाती मोकळी केली असून या घटनेत ८ लाख ४७ हजार रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.